भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या रामनगर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेल्या महिलांना पाणी आल्याच्या आवईने भर सभेतून उठविले. आवई ठोकण्याचा विरोधकांचा हा प्रताप दानवे यांच्या लक्षात आला. तरीही शहरात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे चित्र त्याच वेळी दिसले. दुष्काळाने जिल्हा होरपळून निघाला आहे. उन्हाचा चटका आणि पाणीटंचाईचा फटका यात भाजून निघालेली जनता काहीही ऐकायला तयार नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उमेदवार, कार्यकर्त्यांना पहिले पाण्याचे बोला... नंतरच तुमची कहाणी सांगा...असे मतदार बजावत आहेत. शहराचा ज्या मानाने विस्तार झाला तशा सुविधा शासनकर्ते पुरवू शकले नाहीत. चहुबाजूने बेफामपणे वाढलेले शहर असुविधांच्या गर्तेत सापडले. गेल्या वीस-पंचवीस वर्षात डोळे बंद करून असलेले राज्यकर्ते आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले नेते यांच्याच पापाचे फळ म्हणजे शहरात पाण्यासाठी माजलेला त्राहिमाम् ! सातारा -देवळाई, सिडको -हडको, हर्सुल, नारेगाव, जटवाडा, कांचनवाडी, गारखेडा परिसर सर्वत्र तीव्र पाणीटंचाईच्या झळा सर्वसामान्यांना त्रस्त करणार्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून महिलांनी पाण्याच्या टाकीवर दररोज आंदोलने सुरू केलीत. पाण्याचे टँकर अडवून आपल्या भागात पळवून नेण्याची जणू चढाओढ लागली. नव्या शहराला तसेच नव्या वसाहतींना आठ दिवस पाणी मिळत नाही. तरीही नागरिक मोठ्या संयमाने या परिस्थितीला तोंड देत आहेत. खरेतर औरंगाबादकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! एवढा संयम यांच्यात येतो तरी कुठून? अहो, काय देऊ शकले राज्यकर्ते, इथले पुढारी ?
धड रस्ते आहेत ना पाणी मिळते. एवढ्या सार्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ही लाखोच्या संख्येने असलेली प्रजा अजूनही राज्यकर्त्यांवर प्रेम करते. गतवर्षी कित्येक महिने नाक दाबून शहरवासीयांनी ओकारी आणणारा दुर्गंध सहन केला. अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. अशा परिस्थितीत जनतेने तुम्हाला निवडणुकीत सळो की पळो करून सोडले तर चुकले कुठे? ग्रामीण भागातही परिस्थिती बिकट आहे. मैलोन मैल पाण्याचा थेंब नाही. पाच दहा किलोमीटर अंतरावरून डोक्यावर वाहून नेणारे महिलांचे घोळके दृष्टीस पडतात. जनावरे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. अशा वेळी भोंगा वाजवत सुसाट धावणार्या गाड्या जेव्हा प्रचारासाठी गावात पोहोचतात. तेव्हा सुरकुत्या पडलेले चेहरे पहिला प्रश्न विचारतात, भाऊ, पाणी देता का पाणी ? आगे बढो, विजय असो अशा घोषणा कानी पडल्या की महिलांचा घोळका समोर येतो अन पाण्याच्या तक्रारींचा पाढा वाचतात. गंमत म्हणजे दरवर्षी सामाजिक संस्थांच्या नावाखाली मोफत टँकर वाटणार्यांनी यावर्षी हात आखडता घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागातही सामाजिक कार्य म्हणून कुणी मोफत पाणी वाटताना दिसून येत नाही. सामाजिक कार्याचा उमाळा येणार्या अनेकांनी आता स्वतःला का कोंडुन घेतले ? असा प्रश्न उपस्थित होतो. खरेतर पाण्याची बोंब होण्यापूर्वीच या राजकीय धुरीणांनी मोफत पाण्याची सोय करायला हवी होती. मात्र राजकीय साठमारीत ही बाब यांच्या लक्षात आली आली नाही. आता उशीर झाला आहे, पाण्याची बोंब घराघरातून ऐकायला येते. याचा फटका निवडणुकीत बसणार यात शंका नाही. स्वतःला चाणाक्ष आणि बेरजेच्या गणितात अव्वल मानल्या जाणार्यांनी या गोष्टीकडे का लक्ष दिले नाही, असा प्रश्न पडतो. कोट्यवधींची उधळपट्टी करून राजकीय पक्ष, उमेदवार विजयासाठी वाटेल ते करतील. पाण्याचाच नाही तर मदिरेचाही महापूर येईल. 23 एप्रिल पर्यंत वाटेल ते केल्या जाईल. त्यानंतर मात्र पुन्हा जनता पाण्यासाठी वणवण भटकंती करेल. यापेक्षा वेगळे नशीब औरंगाबादकरांचे नाही, हेच खरे !